इंदापूर: येथील 'अल्फा बाईट' कॉम्प्युटर्स मध्ये आज १६ मार्च २०२६ रोजी तंत्रज्ञान आणि आरोग्य यांचा संगम साधणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट आणि अल्फा बाईट कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा विद्यार्थी आणि नागरिक अशा दोघांनाही मोठा लाभ झाला. संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माती भोसले, सचिव डॉ. श्री. गिरीश देसाई सर यांच्या मार्गदर्शनाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात संस्थेचे खजिनदार मा. तुषार रंजनकर सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणाने केली. त्यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आयटी क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक जागतिक अनुभव असलेले कॉर्पोरेट मार्गदर्शक श्री. महेश बक्शी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेल्या बक्शी सरांनी AI मधील भविष्यातील करिअरच्या संधी आणि या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष कार्यपद्धती यांवर भाष्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर घडणाऱ्या तांत्रिक बदलांची आणि संधींची महत्त्वाची ओळख झाली.
दुसऱ्या सत्रात 'सिनर्जी मेडिकल योग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अनुभवी एंटरप्राइज ट्रान्सफॉर्मेशन लीडर व होलिस्टिक हेल्थ कोच सौ. दिपाली कुलकर्णी यांनी यावेळी मेडिकल योगाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. कंबरदुखी, गुडघेदुखी व मानदुखी यांसारख्या आधुनिक जीवनशैलीतील समस्यांवर 'रोप अँड बेल्ट थेरपी'च्या माध्यमातून कसे उपचार करता येतात, याचे प्रभावी प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. तसेच 'Synergy MYT' या डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती देऊन आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना नवी दिशा दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर यांनी सर्व उपस्थितांचे व मार्गदर्शकांचे आभार मानले. या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप, कर्मचारी अमोल राऊत, त्रिशला पाटील, केदार गोसावी, रोहिणी जाधव, अश्विनी पाटील आणि अभिजित तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन योगसाधना यांचा मेळ घालणाऱ्या या उपक्रमाचे इंदापूर परिसरातून मोठे कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेला नवी चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

