लोणी देवकर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात आज सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. चालत्या गाडीचे टायर अचानक फुटल्याने एक क्रूझर जीप अनियंत्रित झाली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण धडकेत क्रूझरमधील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी (१७ मार्च) सकाळी ९:०० ते ९:१५ च्या सुमारास झाला. एमएच १४ एलबी १६१३ या क्रमांकाची क्रूझर जीप सोलापूर कडून पुण्च्यायाच्या दिशेने जात होती. लोणी देवकर एमआयडीसी परिसरात आली असता, अचानक गाडीचे टायर फुटले. यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ही जीप थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला असलेल्या एमएच १२ वायक्यू ६६०३ या क्रमांकाच्या ट्रकला जाऊन धडकली.
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, क्रूझरच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये गाडीचालक प्रमोद बाळासो खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) यांच्यासह शशांक कोटिया (वय ३२) आणि विजयसिंह राजपूत (वय ३५, दोन्ही रा. मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही मृतात्मे लोणी देवकर एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कामाला होते, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्यामुळे होणाऱ्या अशा अपघातांनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत रस्ता तापल्यामुळे आणि टायरमधील हवेच्या दाबाच्या तफावतीमुळे अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असते. या दुर्दैवी घटनेमुळे लोणी देवकर परिसरात शोककळा पसरली आहे.

