इंदापूर प्रतिनिधी: श्री. महादेव चव्हाण सर
इंदापूर शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘कोकण दर्शन’ सहल अत्यंत उत्साहात आणि सुखद आठवणींसह संपन्न झाली. दिनांक १५ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित या सहलीच्या गाडीचे पूजन इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. भरत शेठ शहा, भाजप नेते मा. श्री. प्रदीप दादा गारटकर, संघाचे अध्यक्ष सुभाष दादा थोरात, सहलीचे मार्गदर्शक संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे, माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, मा. अध्यक्ष श्री. भानुदास पवार, संघाचे सचिव हनुमंत शिंदे, सहलीचे अध्यक्ष भारत बोराटे सर, उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर आणि सहलीचे खजिनदार रामभाऊ जगताप सर यांच्या प्रेरणेतून आयोजन करण्यात आले.
सहलीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात कुलदैवत देव जोतिबाचे दर्शन घेऊन झाली. कोल्हापूरवरून पुढे निघाल्यावर सर्वजण रत्नागिरीला पोहोचलो. रत्नागिरीमधील नवीन तयार करण्यात आलेली रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहण्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक गेले. या शिवसृष्टीमध्ये इतिहासकालीन कुलाबा, दीपस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी आंग्रे, सुभेदार तानाजी मालुसरे, शिवकालीन गाव, युद्ध नौका, विजयदुर्ग, दुर्ग रायगड, गरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग अशी आकर्षक ठिकाणे आणि पुतळे पाहून सर्वांचे मन भारावून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे पोहोचून गणेशाचे दर्शन घेतले व ज्येष्ठ नागरिकांनी समुद्रकाठी मौज-मजा केली. त्यानंतर पावस येथे पोहोचून परमपूज्य स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात स्वामींचे दर्शन घेतले व महाप्रसाद घेऊन सर्वजण मालवण जि. सिंधुदुर्ग येथे तिसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी रवाना झालो. मालवणमधील देवबाग परिसरातील विविध ठिकाणचे पॉईंट्स बोटीमध्ये बसून पाहिले. यामध्ये त्सुनामी बेट, डॉल्फिन मासे, सी-गुल पक्षी (ऑस्ट्रेलिया), मिनी केरळ, भोगवे बीच आणि कांदळवन बेट अशा विविध ठिकाणांचा आनंद लुटला.
मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ७० फुटी पूर्णकृती पुतळ्याचे दर्शन घेतले. या पुतळ्याची पुनर्रबांधणी पाहून सर्वजण थक्क झाले. त्यानंतर रॉक गार्डनमध्ये जाऊन खडकावर तयार केलेली फुलझाडे आणि संगीताच्या तालावर पाण्यावर नाचणारी रंगबिरंगी लाईट पाहिली. पुढे मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी सर्वजण गेलो. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नतमस्तक होऊन गोड्या पाण्याची विहीर, शिव मंदिर आणि भवानी मातेचे दर्शन घेऊन संपूर्ण किल्ला पाहिला.
या सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद सुरेश पवार, तुकाराम देवकर, तात्याराम सांगळे, लहू सांगळे, रघुनाथ दादा खरवडे, वसंतराव जावळे, देवराव मते, किसन काशीद, सावता राऊत, भरत शिरसाट, सहदेव व्यवहारे, ज्योतीराम अनपट, सर्जेराव अनपट या सर्व ज्येष्ठांचा सहभाग होता. प्रवासाच्या शेवटी स्वामी समर्थ हॉटेलमध्ये दुपारचे जेवण करून सर्वजण कणकवली-गगनबावडा मार्गे कोल्हापूर आणि सांगोल्यावरून सुखरूप इंदापूरला पोहोचले. गाडीचे चालक पप्पू भैय्या सय्यद यांनी सर्व ज्येष्ठांना सुरक्षितपणे घरी पोहोचवले. ज्येष्ठांच्या कायम स्मरणात राहील अशी ही तीन दिवसांची त्रासाविना सहल उत्साहात संपन्न झाली.
