इंदापूर (प्रतिनिधी: गणेश धनवडे)
भारतातील स्त्री शिक्षणाच्या जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सावित्रीबाईंच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य गुळीग यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांचा हा विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीने जतन करणे आणि तो पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रा. महादेव माळवे, प्रा. विनायक शिंदे, प्रा. राजलक्ष्मी रणसिंग, प्रा. सुमेधा रणसिंग, प्रा. काजल राजेभोसले, प्रा. आकांक्षा मेटकरी, प्रा. अपेक्षा मेटकरी, प्रा. प्राजक्ता पवार, प्रा. कोमल चव्हाण, प्रा. शितल शिरसट, प्रा. निकीता पांडव, श्रीमती रंजना दणाणे आणि तस्लीम शेख या मान्यवरांसह महाविद्यालयातील 'सावित्रीच्या लेकींनी' उपस्थित राहून आपल्या लाडक्या माऊलीला अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांनी आपले पती महात्मा जोतिराव फुले यांच्या सहकार्याने सन १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या काळी महिलांना शिक्षण देणे हे अत्यंत धाडसाचे काम मानले जात असे. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
प्लेगच्या भीषण साथीच्या काळात रुग्णांची सेवा करताना १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले. त्यांचे कार्य केवळ एका काळापुरते मर्यादित नसून, शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा त्यांनी दिलेला संदेश पुढील अनेक पिढ्यांना दिशा देणारा ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रांतीज्योतींच्या कार्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.
