इंदापूर प्रतिनिधी - श्री. गणेश धनवडे
कळंब (इंदापूर): इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कळंब-वालचंदनगर) येथे विज्ञान विभागाच्या वतीने 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञानाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या उद्देशाने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सविस्तरपणे मांडले. 'सर सी. व्ही. रामन' यांच्या संशोधनाचे स्मरण करत त्यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महादेव माळवे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
या सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम, विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त शंकरराव रणसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे आणि विज्ञान विभागप्रमुख डॉ. सुहास भैरट यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावली. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. आकाश झगडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. आकांक्षा मेटकरी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विज्ञानाप्रती रुची निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
