पुणे/मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून भारतीय हवामान विभागाने आता धोक्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यातील एकूण १२ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मार्च महिन्याचा शेवटचा दिवस असतानाही पावसाचा जोर कमी होताना दिसत नाही. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीची दाट शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण राज्यातही पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला असून सकाळपासूनच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. या अनपेक्षित हवामान बदलामुळे मुंबईसह राज्याच्या अन्य भागांतही ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.
या अस्मानी संकटामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः मालेगाव आणि सटाणा पट्ट्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांवर संकट ओढवले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गाची मोठी धांदल उडाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गारपिटीचा सर्वाधिक फटका कांदा, डाळिंब आणि मका या पिकांना बसण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातही वादळी वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेरसह धुळे तालुक्यातील कुसुंबा भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा, मका आणि ज्वारी-बाजरीच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यातील हवामानाची ही स्थिती पुढील काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी आणि नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

