इंदापूर (प्रतिनिधी): गणेश धनवडे
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये निमसाखर व परिसरातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रकट दिनाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पादुकांची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी राजेंद्र मारुती घोडे यांनी श्रींच्या पालखीची आकर्षक सजावट केली होती. गावातील महिला स्वामी भक्तांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढून पालखीचे उत्साहात स्वागत केले. संपूर्ण गावात 'श्री स्वामी समर्थ' नामाचा जयघोष करत हा सोहळा संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी अनेक भक्तांनी आपली सेवा स्वामी चरणी अर्पण केली. सौ. सुषमा सुनीलराव मोरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मंदिर समितीला स्पीकर संच भेट दिला. मंदिरातील रांगोळीची सुंदर सेवा शितल सुनील टकले यांनी बजावली. तसेच, पत्रकार गणेश धनवडे यांच्या वतीने उपस्थित भाविकांना जिलेबीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
रात्री साडेसात वाजता ह.भ.प. श्री धैर्यशीलभाऊ देशमुख (नातेपुते) यांचे 'स्वामी चरित्र' या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन झाले. प्रवचनानंतर श्रींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर राजाराम संभाजी जाधव यांच्या वतीने भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, ज्यामुळे परिसर उजळून निघाला. त्यानंतर मंदिरात सामूहिक आरती आणि जप घेण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली, ज्याचे आयोजन राजेंद्र हनुमंतराव रणवरे (मुकादमवाडा) यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी वालचंद नगरचे ज्येष्ठ स्वामीभक्त श्री. राम कुंभार सर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. निमसाखर आणि परिसरातील स्वामी भक्तांच्या उपस्थितीने हा प्रकट दिन सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

