इंदापूर प्रतिनिधी : श्री. आदित्य राखुंडे
इंदापूर शहरामध्ये रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. महिनाभराच्या उपवासानंतर येणाऱ्या या सणाचे औचित्य साधून, इंदापूरमधील राजवेलीनगर येथील प्रसिद्ध दर्गा हजरत सय्यद ताजुद्दीन राजबागसवार बाबांच्या परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यानिमित्त आयोजित मेजवानीने परिसरातील वातावरण भक्तीमय आणि उत्साही झाले होते.
या विशेष दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते श्री. अरबाज शेख आणि ॲडव्होकेट श्री. अक्रम शेख यांच्या वतीने सर्व धर्मीय बांधवांसाठी 'शिरखुरमा' (ईद विशेष मेजवानी) कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राजबागसवार बाबांच्या दरबारी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना ईदचा गोडवा चाखता यावा, या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले होते. आयोजकांनी केलेल्या या आदरातिथ्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
याच सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इंदापूरच्या सार्वजनिक जीवनातील प्रमुख मान्यवर श्री. भरत शेठ शहा, श्री. प्रदिप दादा गारटकर, श्री. श्रीराज भरणे, श्री. अक्षय भरणे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. या सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थितांशी संवाद साधत ईदचा आनंद द्विगुणित केला, ज्यामुळे या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक सलोख्याची खऱ्या अर्थाने एक अनोखी गुंफण पाहायला मिळाली. कार्यक्रमाचा सामाजिक सलोखा लक्षात घेऊन इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नाळे साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या उपक्रमाला विशेष भेट देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
केवळ राजकीयच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमाला हजेरी लावली. यामध्ये आयोजकांचे वकील बंधू आणि शहरातील पत्रकार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिरखुरमाचा आस्वाद घेतला. इंदापूरच्या प्रथेप्रमाणे येथेही हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील लोक एकत्र आल्याने या ठिकाणी खऱ्या अर्थाने सामाजिक सलोख्याची आणि एकोप्याची भावना पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर चाललेल्या या शिरखुरमा वाटप उपक्रमामुळे इंदापूर शहरात सौहार्दाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजबागसवार बाबांच्या आशीर्वादाने इंदापुरात नेहमीच सर्व धर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहतात, हाच संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला. या उपक्रमामुळे इंदापूरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

