इंदापूर: सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षीही होळीचे औचित्य साधून 'दुर्गुणांची होळी' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. केवळ लाकडे किंवा गोवऱ्या जाळण्यापेक्षा, स्वतःमधील दोषांचे दहन करून सद्गुणांचा अंगीकार करावा, हा संत तुकाराम महाराजांचा विचार या उपक्रमाच्या केंद्रस्थानी होता.
जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ देत या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले की, खरी होळी ही आपल्यातील दोषांची झाली पाहिजे. "मी होळीत माझे दोष जाळले" असे म्हणणाऱ्या तुकोबांचा विचार मनामध्ये ठेवून, उपस्थित नागरिकांनी मत्सर, अहंकार, स्वार्थ, माया आणि व्यसने अशा विविध दुर्गुणांचे नामोल्लेख असलेले कागद अग्नीत अर्पण केले. नकारात्मक विचारांचे उच्चाटन करून मानवाने विठ्ठल नामाच्या आणि संत सहवासाच्या आनंदाकडे वळावे, असा मौलिक संदेश यावेळी देण्यात आला.
सदर कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. तुषार रंजनकर यांनी सांगितले की, "जोपर्यंत आपण आपल्यातील दोष जाळत नाही, तोपर्यंत खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. दोषांचे दहन झाले की दैन्य आणि दुःख आपोआप दूर पळते."
या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी सांगितले की, "होळी हा सण केवळ अंधश्रद्धा किंवा बाह्य आगीपुरता मर्यादित न राहता, तो आत्मपरीक्षणाचा सण बनला पाहिजे. स्वतःच्या मनातील दुर्गुण ओळखून ते जाळणे आणि एक उत्तम नागरिक म्हणून समाजासमोर आदर्श ठेवणे, हीच खरी होळी आहे."
कार्यक्रमात आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि वैचारिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून टाकल्यास माणूस खऱ्या अर्थाने सुखी आणि निरोगी होतो. 'दुर्गुणांची होळी' हा उपक्रम सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे."
याप्रसंगी 'कोपिवरची शाळा' उपक्रमाचे प्रमुख श्री. भारत बोराटे, श्री. हमीदभाई आत्तार, योगरत्न श्री. दत्तात्रय अनपट, श्री. दिलीप जाधव, इन्चार्ज दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, अमोल राऊत, केदार गोसावी, रोहिणी जाधव, अनिल शिळनकर आणि प्रथमेश मंगवडे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते. सामाजिक परिवर्तनाची ही चळवळ अशा वैचारिक उपक्रमांतून अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

