इंदापूर प्रतिनिधी : श्री. महादेव चव्हाण
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या नवीन संचालक मंडळाची आगामी तीन वर्षांच्या (२०२६-२०२८) कार्यकाळासाठी शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमध्ये अनुभवी आणि उत्साही सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आणि उपक्रमांवर भर देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
संघाच्या अध्यक्षपदी माननीय श्री. सुभाष जनार्दन थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून श्री. बाळकृष्ण क्षिरसागर आणि श्री. जवाहर बोरा या दोन अनुभवी व्यक्तींची वर्णी लागली आहे. संघाची आर्थिक धुरा खजिनदार म्हणून अशोक गानबोटे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, सचिवपदी हनुमंत शिंदे तर सहसचिव म्हणून रामदास जगताप यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संघाच्या कामकाजाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
संघाच्या मार्गदर्शनासाठी बाबासाहेब घाडगे, भानुदास पवार, नंदकुमार गुजर आणि पांडुरंग जगताप यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संचालक मंडळामध्ये अंकुश ढुके, प्रमोद भंडारी, संपत घाडगे, हरीभाई गुजराथी, बबन क्षीरसागर, दत्तात्रेय अनपट, बळीराम शिंदे, केशव बनसुडे, हमीदभाई आत्तार, विलास गायकवाड, महादेव तावरे, विजय भामरे आणि दिलीप जाधव यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी म्हणून जयश्री पोतदार मॅडम आणि सौ. छाया जाधव मॅडम यांची निवड झाली असून, सौ.जयश्री गानबोटे आणि रंगनाथ मधुरकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
संघाच्या विविध विभागांची जबाबदारी सोपवताना महादेव चव्हाण यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून, तर भारत बोराटे सर यांची सहल प्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. ही सर्व निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नवीन कार्यकारिणीमध्ये समाजातील विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींचा समावेश असल्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सामाजिक कार्याचा विस्तार होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
निवडीनंतर नवनिर्वाचित सदस्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला. वृक्ष संजीवनी परिवाराच्या अध्यक्षा सौ. सायराभाभी आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर आणि भारत बोराटे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना फुलांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यावरणाचा संदेश देत करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सत्काराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
