इंदापूर (पुणे): विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि थोर महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे, या उदात्त हेतूने इंदापूरचे शिक्षण पितामह गुरुवर्य शंकरराव जावडेकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ रेडणी केंद्रातील १८ शाळांमधील ४१० विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी गोष्टींच्या पुस्तकांचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता हा प्रेरणादायी सोहळा पार पडला. शंकरराव जावडेकर ट्रस्ट आणि त्यांचे नातू सौजन्य पद्माकर जावडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिवीर राणी लक्ष्मीबाई, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक तसेच विविध देशभक्त आणि संतांच्या विचारांवरील पुस्तके देण्यात आली. रेडणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सर्जेराव खुपसे यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक श्री. महादेव चव्हाण सर यांनी केले.
श्रीमती फुले मॅडम यांनी शंकरराव जावडेकर यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देताना सांगितले की, प्राथमिक शिक्षकांच्या सोसायटीचे त्यांनी लावलेले छोटेसे रोप आता एका विशाल महावृक्षात रूपांतरित झाले आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख खुपसे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद गारटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आम्ही फक्त पालखीचे भोई आहोत, जावडेकरांचे नातू पद्माकर जावडेकर यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, हनुमंतराव गोफणे यांच्यासह अनेक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा रेडणीच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा तरंगे मॅडम, बोराटवाडी शाळेचे भागवत राऊत, चाकाटी शाळेचे शशिकांत कुलकर्णी, काळे वस्ती शाळेचे ज्ञानेश्वर कुचेकर, ढोले मळा शाळेच्या संध्याराणी पोळ मॅडम, रेडा शाळेच्या श्रीमती रोहिणी निंबाळकर मॅडम, काठी मळा शाळेचे विजय ठोंबरे आणि सवासेवस्ती शाळेच्या श्रीमती सुरेखा अभंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच बो. हेगडकरवस्ती शाळेचे सुधाकर आवाड, दत्तनगर शाळेचे राजाराम भोसले, विकासवाडी शाळेचे उद्धव गरगडे, जाधव वस्ती शाळेचे गणेश डोईफोडे, कोकरे क्षीरसागर वस्ती शाळेचे लक्ष्मण कुचेकर, ठावरे वस्ती शाळेचे आणा आरडे, कदम वस्ती शाळेचे नितीन वाघमोडे, काळकुटे वस्ती शाळेच्या मनीषा कुचेकर, साखरे वस्ती शाळेचे मल्लिकार्जुन वच्चे आणि खोरोची शाळेचे दिलीप पोळ हे मुख्याध्यापक व शिक्षकही या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत बोराटे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ठोंबरे सरांनी मानले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ४१० विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके आणि खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली. नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

