- डॉ. स्नेहल महेशकर ( मानसशास्त्रीय समुपदेशक )
Neuro Parenting & Smart Studies Mentor
निकालाचा दिवस. मोबाईलवर वेबसाइट उघडलेली. हृदयाची धडधड वाढलेली. स्क्रीनवर दिसणारे आकडे फक्त गुण नसतात; त्या आकड्यांमध्ये मुलाची मेहनत, अपेक्षा, भीती आणि स्वप्नं सामावलेली असतात. निकाल पाहिल्यानंतर काही क्षण मुलं शांत होतात — कधी आनंदाने, कधी संभ्रमाने, तर कधी निराशेने. अशा वेळी पालक प्रेमाने विचारतात — “किती टक्के आले?” किंवा “काय मिळालं?” हेतू नक्कीच काळजीचा; पण कधी कधी हा प्रश्न मुलाच्या मनावर अनपेक्षित दबाव निर्माण करू शकतो.
निकालाच्या क्षणी मुलाचा मेंदू आधीच भावनांनी भरलेला असतो. आनंद, दिलासा, अपेक्षा, तुलना, भीती — अनेक भावना एकत्र सक्रिय झालेल्या असतात. मेंदूमधील भावनिक भाग (amygdala) जास्त सक्रिय असतो, तर तर्कशक्ती व शांत विचार करण्याची क्षमता तात्पुरती कमी असू शकते. त्यामुळे त्या क्षणी मुलाला सर्वात जास्त गरज असते ती भावनिक आधाराची, स्वीकाराची आणि सुरक्षिततेची.
निकालानंतर लगेच तुलना, पुढील करिअरचे प्रश्न, किंवा “आणखी जास्त मिळायला हवे होते” अशा प्रतिक्रिया मुलामध्ये आत्मसंशय वाढवू शकतात. काही मुलं स्वतःवरच नाराज होतात, तर काही स्वतःची तुलना मित्रांशी करू लागतात. विशेषतः सोशल मीडियावर टॉपरचे फोटो, टक्केवारी, अभिनंदनाचे संदेश पाहून काही मुलांना स्वतःचे यश कमी वाटू शकते. त्यामुळे पालकांचा एक छोटासा प्रतिसाद मुलाच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम करू शकतो.
यासाठी छोटासा पण महत्त्वाचा बदल उपयुक्त ठरतो. निकाल पाहिल्यानंतर लगेच टक्केवारीवर चर्चा करण्याऐवजी, “तुला कसं वाटतंय?”, “तू खूप मेहनत घेतलीस”, “आपण पुढचा मार्ग शांतपणे ठरवूया” असे संवाद मुलाला भावनिक स्थैर्य देतात. अशा संवादातून मुलाला हे जाणवतं की त्याची किंमत फक्त गुणांवर अवलंबून नाही. जेव्हा मुलाला स्वीकाराची जाणीव होते, तेव्हा तो स्वतःहून पुढील पर्यायांचा विचार करण्यास अधिक तयार होतो.
निकालानंतर करिअर निवड हा देखील संवेदनशील टप्पा असतो. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखा निवडताना अनेकदा समाजातील लोकप्रिय पर्यायांचा प्रभाव जास्त असतो. परंतु प्रत्येक मुलाची क्षमता, आवड आणि व्यक्तिमत्व वेगळं असतं. योग्य निर्णयासाठी मुलाच्या strengths, aptitude आणि interest यांचा विचार होणं आवश्यक आहे. पालकांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावावी; निर्णय लादण्याऐवजी मुलासोबत संवाद साधावा.
या सगळ्या प्रक्रियेकडे “Neuro Parenting” या दृष्टिकोनातून पाहिल्यास एक महत्त्वाचं तत्त्व समोर येतं — मुलांची प्रगती केवळ गुणांवर अवलंबून नसून त्यांच्या भावनिक सुरक्षिततेवरही अवलंबून असते. Neuro Parenting मध्ये सांगितलं जाणारं मूलभूत सूत्र आहे — “Connection before Correction.” म्हणजेच, कोणताही सल्ला देण्यापूर्वी मुलाशी भावनिक जोड निर्माण करणं. जेव्हा मुलाला समजून घेतलं जातं, तेव्हाच त्याचा मेंदू नव्या संधींसाठी खुला होतो.
निकाल हा यशाचा शेवट नसतो, तर पुढील प्रवासाची सुरुवात असते. पालकांचा समजूतदार संवाद हा त्या प्रवासातील सर्वात मोठा आधार ठरू शकतो.
परीक्षा ज्ञानाची असते; पण निकालानंतरचा संवाद — नात्यांच्या समजुतीची.

