इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित, श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालयात 'वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ' मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. 'जल्लोष चिमुकल्यांचा, आविष्कार कलागुणांचा' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याने इंदापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. डॉ. अविनाश पाणबुडे व आय कॉलेजचे प्राचार्य जीवन सरवदे उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये नृत्य, संगीत आणि नाटिकांच्या माध्यमातून चिमुकल्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर विविध सामाजिक संदेशही दिले. हे सादरीकरण पाहण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्रीडा, कला आणि अभ्यास अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. जीवन सरवदे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या हस्ते बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या पाल्यांचे यश पाहून पालकांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव ओसंडून वाहत होते.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यामध्ये प्राध्यापक श्री. शिवाजीराव, माजी विस्तार अधिकारी श्री. पुष्पराज जमदाडे, ज्येष्ठ समाजसेवक हमीद आत्तार, वृक्ष संजीवनी परिवार आणि समाजसेविका सौ. सायराभाभी अत्तार, वृक्षमित्र श्री. चंद्रकांत देवकर, श्री. अशोक अनपट (नाना) आणि अंगणवाडी समन्वयक सोमेश सर यांचा समावेश होता. तसेच संस्थेच्या पदाधिकारी सौ. उमा गिरीश शहा, सौ. अर्पिता आदित्य शहा, श्री. आदित्य गिरीश शहा, ॲड. श्री. ओमकार गिरीश शहा आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हुसेन इलाही मोमीन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन इंदापूर शहर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व घटकांनी परिश्रम घेतले, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

