इंदापूर, डॉ. संदेश शहा.
एकेकाळी दुष्काळी असलेल्या मात्र त्यानंतर भजनदास पवार यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून पाणीदार झालेल्या कडबनवाडी ( ता. इंदापूर, जि. पुणे ) या गावाचे नाव आज महाराष्ट्रात आदर्श जलव्यवस्थापन आणि शाश्वत विकासासाठी अभिमानाने घेतले जाते. या परिवर्तनामागे जलभूषण भजनदास पवार यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. जलक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘जलभूषण पुरस्कार – २०२२’ त्यांना घोषित करण्यात आला आहे. हा त्यांच्या प्रामाणिक, निस्वार्थी, दूरदृष्टी आणि समाजाभिमुख कार्याचा सन्मान आहे.
सन १९७२ च्या भीषण दुष्काळाने प्रेरित होऊन त्यांनी जलसंधारणाच्या कार्याची सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून, नोकरी सांभाळत त्यांनी गावाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले. पुढे त्यांनी नोकरीमधून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेत सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले,ही त्यांच्या कार्यनिष्ठेची मोठी ओळख आहे. समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कडबनवाडीत श्रमदान तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची प्रभावी चळवळ उभी केली.
माथा ते पायथा या पाणलोट क्षेत्राच्या तत्त्वावर आधारित काम करत त्यांनी विविध जलसंधारण प्रकल्प यशस्वीपणे राबवले. यामुळे गावात शाश्वत विकास घडून आला. त्यामुळे शेती व ग्रामीण अर्थकारणात सकारात्मक बदल झाले असून कडबनवाडीचे हे मॉडेल आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
याशिवाय, त्यांनी गावात विविध सहकारी संस्था स्थापन करून शेतकरी व ग्रामस्थांना आर्थिक बळ दिले. त्यांच्या स्वयंसेवी संस्थांमार्फत पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि सर्वांगीण ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली. राष्ट्रीय पाणलोट विकास योजना’, ‘आदर्श गाव योजना’ आणि ‘जलयुक्त शिवार’ यांसारख्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी कडबनवाडी गाव पाणीदार, समृद्ध आणि आदर्श बनवले. आज “जलभूषण भजनदास पवार” यांचे कार्य केवळ एका गावापुरते मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहे. विशेष म्हणजे कडबनवाडी परिसरात चिंकारा जातीची हरणे आहेत. त्यांना चारा तसेच पाणी उपलब्ध झाल्याने त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कळपाने फिरणारे चिंकारा हरिणे पाहण्यासाठी प्राणीप्रेमी कडबनवाडी येथे भेट देत आहेत.
या पुरस्कारामूळे भजनदास पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संदर्भात बोलताना भजनदास पवार म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जलभूषण पुरस्कार घोषित झाल्याने खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार जरी मला घोषित झाला असला तरी या जल, माती व पर्यावरण संवर्धन चळवळीत काम करत असलेल्या सर्वांचाच हा पुरस्कार सन्मान आहे. या पुरस्कारामुळे कडबनवाडीचे नाव संपूर्ण राज्यात गेले असले तरी या गावाचा नावलौकिक देश परदेशात जाण्यासाठी आपण सर्वांनी या पुढे देखील प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान या पुरस्कारा बद्दल राज्याचे अवर सचिव वैभव फाळके यांनी माननीय राज्यपाल महोदय यांच्या आदेशाने जलभूषण पुरस्कार २०२२ चे पत्र दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केले आहे. या पत्रानुसार वरूड जिल्हा अमरावती येथील शरद पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय देशमुख यांना प्रथम, छत्रपती संभाजीनगर ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांना व्दितीय तर कडबनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील भजनदास पवार तसेच मोरगाव खुर्द तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रतीराम पाटील यांना विभागून तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार २०२२ घोषित करण्यात आला आहे.
