इंदापूर : आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि कैवल्यधाम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले, सचिव डॉ. श्री. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनातून एका भव्य योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून योगाभ्यासाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, इंदापुरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर योगामय झाला होता.
हे विशेष योग शिबिर एकूण ५ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे पहिले सत्र पहाटे ५.३० वाजता शहा सांस्कृतिक भवन येथे झाले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अल्फा बाईट कॉम्प्युटर्स येथे शिबिर घेण्यात आली. प्रामुख्याने 'मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य' या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या युगात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासोबतच मन शांत आणि संतुलित कसे ठेवावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
शिबिराचे आयोजन करणाऱ्या दोन्ही संस्थांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा मोठा आहे. कैवल्यधाम ही संस्था योग प्रसार आणि संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असून, पारंपारिक योगाला विज्ञानाची जोड देण्याचे कार्य करते. तर दुसरीकडे, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, तसेच ग्रामीण भागातील तरुण, तरुणी व महिलांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. या दोन्ही नामांकित संस्थांनी एकत्र येऊन आरोग्य जनजागृतीसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.
शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे कैवल्यधामचे अनुभवी योगशिक्षक श्री. योगेश वैद्य आणि आरती पवार यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. शरीर आणि मन यांचा समन्वय साधून उत्तम जीवनशैली कशी जगावी, यावर त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विशेष भर दिला. शिबिरातील शिस्त आणि प्रशिक्षणार्थींचा उत्साह यावेळी वाखाणण्याजोगा होता.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी ट्रस्टच्या विविध विभागांना भेटी देऊन संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी संस्थेत सुरू असलेल्या विविध व्यावसायिक कोर्सेसची सविस्तर माहिती जाणून घेतली. या प्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, 'डिजिटेक इंडिया'चे श्री. अजित गटे आणि पतंजली योगचे शिक्षक श्री. दत्तात्रय अनपट, श्री. चंद्रकांत देवकर, श्री. प्रशांत गिड्डे व श्री. अशोक अनपट, संस्थेचे कार्यकर्ते श्री. महादेव चव्हाण, श्री. हमीदभाई अत्तार, श्री. भारत बोराटे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप, श्री. अमोल राऊत, सौ. त्रिशला पाटील, सौ. रोहिणी जाधव, केदार गोसावी, वेदांत घोरपडे, संग्राम यादव, कुमार गवळी यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे आणि सुयोग्य नियोजनामुळे हे भव्य योग शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले.

