इंदापूर: वाढत्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाची जोड देत, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल्फा बाईट कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १२ मे २०२६ रोजी एका विशेष मार्गदर्शन व 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तसेच अल्फा बाईट चे प्राचार्य श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, परिश्रम या विषयांसोबत तंत्रज्ञानाचे महत्वही समजावले. ते म्हणाले, "आजच्या काळात केवळ पारंपरिक अभ्यासावर अवलंबून राहून चालणार नाही. कठोर परिश्रमाला 'स्मार्ट वर्क' आणि 'AI' सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेची बचत करून अचूक माहिती मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हीच आता यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे."
या प्रेरणादायी सत्रानंतर, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अधिक सोपा आणि अचूक करण्यासाठी AI टूल्सचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे सविस्तर प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. संस्थेचे प्रकल्प अधिकारी सागर कांबळे आणि अल्फा बाईटचे प्रशिक्षक अभिजित तळेकर यांनी या विशेष सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला इंदापुरातील नामांकित 'अहिल्या अकॅडमी'चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, अकॅडमीचे संस्थापक श्री. सुभाष पाटील हेदेखील आवर्जून उपस्थित होते. श्री. पाटील यांच्या अथक परिश्रमातून आणि अचूक मार्गदर्शनातून आजवर तब्बल १०७ विद्यार्थी पोलीस दलात यशस्वीरीत्या भरती झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय आणि भरीव योगदानाची दखल घेत, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल्फा बाईट यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. मेहनतीला तंत्रज्ञान आणि स्मार्ट वर्कची सांगड घालत यश कसे मिळवावे, याची एक नवी आणि सकारात्मक दिशा या नाविन्यपूर्ण कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळाली.

