महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इंदापूरमध्ये शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला. समाजातील वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने मागील दोन वर्षांपासून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विषयांवर जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन केले जात आहे. याच अनुशंघाने संस्थेच्या वतीने 'मोबाईल व्यसनमुक्ती' या सद्यस्थितीतील अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर एका प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण करत समाजाला एक विचार करायला लावणारा संदेश दिला.
या पथनाट्याचे सादरीकरण इंदापूर नगरपरिषद येथे पार पडलेल्या महाराष्ट्र दिनाच्या विशेष कार्यक्रमात करण्यात आले. अल्फा बाईट च्या विद्यार्थ्यांनी सदरीकरनामध्ये विशेष सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या या कलाकृतीचे आणि त्यांनी दिलेल्या सखोल संदेशाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, हे पथनाट्य अतिशय सकारात्मक दिशा देणारे आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने समाजाच्या भल्यासाठी असेच उपक्रम यापुढेही अविरतपणे राबवावेत. यासोबतच, मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे यांनीही या विषयाचे गांभीर्य उपस्थितांसमोर अधोरेखित केले. आजच्या गतिमान काळात मोबाईल ही एक अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे हे नाकारता येणार नाही, परंतु त्याच्या अतिरेकी वापरामुळे सर्वांच्याच शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारचे समाजप्रबोधन करणारी पथनाट्ये ही खऱ्या अर्थाने सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे ठाम मत श्री. ढगे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला इंदापूरचे नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे, संस्थेचे कार्यकर्ते श्री. हमीदभाई अत्तार, संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे तसेच नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून आणि संवादातून मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे तरुणाई, लहान मुले आणि एकूणच कौटुंबिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम अत्यंत मार्मिकपणे मांडून उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली.
नगरपरिषदेतील या मुख्य सादरीकरणापूर्वी, सकाळी पतंजली योग परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या योग वर्गामाध्येही या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते. सकाळच्या सत्रातही उपस्थित योगाभ्यासक आणि नागरिकांनी या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. समाजाला अंतर्मुख करायला लावणारे हे पथनाट्य आदित्य बनगर, आर्यमन गानबोटे, प्रथमेश बोराटे, प्राजक्ता शिंदे, राधिका आरडे, क्षितिजा कोळी, प्रतीक्षा गवळी ओम कारंडे आणि आरती कारंडे या विद्यार्थ्यांनी अत्यंत ताकदीने सादर केले. या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप,अमोल राउत,केदार गोसावी यांनी विशेष सहकार्य केले. समाजातील एका गंभीर समस्येकडे अचूक लक्ष वेधून घेत हा महाराष्ट्र दिन इंदापूरकरांसाठी खऱ्या अर्थाने प्रबोधनात्मक आणि संस्मरणीय ठरला.

.jpeg)
