इंदापूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तसेच अल्फा बाईटचे प्राचार्य श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली “मी मोठा होणार” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये सामाजिक मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि “मी मोठा होणार” ही प्रतिज्ञा घेत समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा निर्धार केला. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, लाच देणार नाही, वाहतुकीचे नियम पाळेन, मोबाईल व इंटरनेटचा मर्यादित व शहाणपणाने वापर करेन, मोठ्यांचा सन्मान करेन, पर्यावरणाचे रक्षण करेन, महिलांचा सन्मान करेन, आरोग्याची काळजी घेईन, प्रत्येक दिवशी नवे काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेन, देशभक्ती व मानवतावादी विचार जोपासेन अशा विविध सकारात्मक वर्तनाच्या संकल्पांची प्रतिज्ञा घेतली. अल्फा बाईटच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा उपक्रमाचे प्रमुख श्री. भारत बोराटे, राधिका विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. बोंगाणे, श्री. हमीदभाई अत्तार आणि संस्थेचे इंचार्ज श्री. दिपक जगताप, श्री. सागर कांबळे, केदार गोसावी, अभिजित तळेकर यांसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.


