इंदापूर: पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाह्यवळणापासून (बायपास) जुन्या रस्त्याने इंदापूर शहराकडे जाणाऱ्या मार्गावर सध्या अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या अंतर्गत रस्त्याचे चार पदरी (४ लेन) रुंदीकरण करण्यात आले असले, तरी रस्त्यावरून गेलेल्या पाण्याच्या कॅनॉलच्या पुलाचे रुंदीकरण करण्यास प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा रस्ता 'पुढं रुंद, मध्येच अरुंद' असा जीवघेणा ठरू शकतो.
व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंस्टाग्राम पेज ला जॉइन होण्यासाठी वरील फोटोला टच करा
बाह्यवळणावरून शहरात येणारा हा अंतर्गत रस्ता इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधून तालुक्याच्या ठिकाणी कामानिम्मित येणारे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी तसेच पुण्यावरून इंदापूर मध्ये काही कामानिमित्त येणारे नागरिक व वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, रस्ता क्रॉस करून गेलेल्या पाण्याच्या कॅनॉलवर असलेल्या पुलाचे रुंदीकरण रखडल्याने डाव्या बाजूने (बाहेरच्या लेनने) येणाऱ्या वाहनांना अचानक समोर पूल आल्यामुळे आपली वाहने आतील लेनमध्ये वळवावी लागत आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, या अरुंद पुलाला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही मजबूत कठडे किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी किंवा अनोळखी प्रवाशांना पुढे रस्ता अरुंद होत आहे याची पूर्वकल्पना देण्यासाठी कोणताही दिशादर्शक किंवा सूचना फलक लावण्यात आलेला नाही. अंधारामध्ये हा पूल चालकांच्या निदर्शनास येत नसल्याने थेट वाहन पुलाखाली कॅनॉलमध्ये कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
"रस्ता एवढा छान आणि रुंद केलाय की वाहने वेगात असतात. पण अचानक समोर अरुंद पूल आल्यावर ब्रेक दाबावा लागतो. प्रशासनाने एखादा मोठा अपघात होऊन निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात."
- स्थानिक नागरिक, इंदापूर
या जीवघेण्या समस्येवर "एकतर प्रशासनाने तातडीने या पुलाचे रुंदीकरण करावे, किंवा पुलाला व्यवस्थित मजबूत संरक्षक कठडे बांधून त्यावर ठळक सूचना फलक आणि रात्री चमकणारे रिफ्लेक्टर लावण्यात यावेत," अशी आग्रही मागणी आता सर्व नागरिकांमधून आणि वाहनधारकांमधून केली जात आहे. आता यावर संबंधित प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


