इंदापूर, २० मे २०२६: महिला सक्षमीकरणाच्या उदात्त हेतूने आज इंदापूर येथील अल्फा बाईट कॉम्प्युटर्सच्या हॉलमध्ये इंदापुरातील विद्यार्थिनींसाठी एका महत्त्वपूर्ण आणि मोफत कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा स्तुत्य उपक्रम शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि 'ई सहेली फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. ट्रस्टच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर आणि 'ई सहेली फाउंडेशन'चे श्री. नेजस निकुंब यांच्या विशेष संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले मोफत स्कील कोर्सेस उपलब्ध झाले असून, त्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
या कार्यशाळेत एकूण ३० हून अधिक विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थिनींना 'ई सहेली फाउंडेशन' आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक अनमोल भेट देण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थिनीला ₹ २५०० पर्यंत मार्केट व्ह्यॅल्यू असलेल्या किमतीचे विविध कौशल्य विकास कोर्सेस पूर्णपणे मोफत वितरित करण्यात आले. महिलांना व्यावसायिक स्तरावर सक्षम बनवणे, त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत करणे आणि त्यांनी समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, हा या मोफत कोर्सेस वाटपामागील मुख्य उद्देश होता.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी महिला सबलीकरणाचे महत्त्व विशद केले आणि त्यांच्या भाषणातून विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. तसेच, 'ई सहेली फाउंडेशन'चे श्री. नरसिंह गुरव यांनी विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण व फ्री कोर्सेसच्या स्वरूपाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ई सहेली फाउंडेशनच्या समन्वयक गायत्री जवळगीकर, मयुरी भालेराव, यश पवार, ट्रस्टचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप आणि कर्मचारी श्री. केदार गोसावी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सर्व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लाभले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. सागर कांबळे यांनी केले. महिलांना कौशल्य विकासाची ही सुवर्णसंधी मिळाल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले असून, हा उपक्रम ट्रस्ट आणि फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा ठरला आहे.
