डॉ. संदेश शहा, पुणे
विद्येचे माहेरघर असलेल्या तसेच संचित वाचन संस्कृतीचा वारसा जपणा-या पुणे शहराने पुन्हा एकदा आपले वेगळेपण पुस्तक महोत्सवाच्या निमित्त सिद्ध केले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या 'पुणे पुस्तक महोत्सवात' अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत सुमारे ३० लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली असून यातून ५० कोटी रुपयांची ऐतिहासिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महोत्सवाने लोकप्रियतेचे आणि विक्रीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. वाचाल तर शिकाल, शिकाल तरच टिकाल आणि वाचाल सुद्धा हा संदेश संवर्धित करत हा महोत्सव संपन्न झाला. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील ज्ञानयज्ञाला साडेबारा लाख नागरिकांनी प्रत्यक्ष उस्फुर्त भेट देऊन उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, या महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक तरुण पिढीचा समावेश होता. मोबाईल आणि गॅजेट्सच्या युगातही तरुणाई मोठ्या संख्येने पुस्तकांकडे वळत असल्याचे आश्वासक चित्र या महोत्सवा निमित्त पाहायला मिळाले, असे मत या पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केले.
या महोत्सवाचे यश केवळ विक्रीपुरते मर्यादित नसून, जागतिक स्तरावरही त्याची दखल घेतली गेली आहे. महोत्सवातील विविध उपक्रमांची तब्बल तीन 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 'मध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, 'पुणे लिट फेस्ट' आणि 'विंटर कॉर्नर' सारख्या व्यासपीठांवर १२२ नामवंत वक्त्यांनी वाचकांशी संवाद साधला, ज्यामुळे महोत्सवाच्या वैचारिक उंचीत मोठी भर पडली. साहित्याच्या प्रसारासाठी या महोत्सवाने मोलाची भूमिका बजावली असून, ९ दिवसांत विक्रमी ७१८ नवीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सुमारे २०० हून अधिक ग्रंथालये, शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी या ठिकाणाहून लाखो रुपयांच्या पुस्तकांची खरेदी केली. यामुळे हा महोत्सव आता केवळ पुण्याचा न राहता संपूर्ण राज्याचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा बनला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे ४०० शाळांमधील ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्रंथदिंडी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे फर्ग्युसन कॉलेजच्या परिसराला एका मोठ्या संमेलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. १ हजारहून अधिक साहित्यिकांनी या महोत्सवाला दिलेली भेट हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आयोजकांनी पुढील वर्षाचे नियोजन देखील आतापासूनच जाहीर केले आहे. आगामी 'पुणे पुस्तक महोत्सव' १२ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर अधिक भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल. पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि पुणेकर वाचकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हे यश साध्य झाल्याची भावना आयोजन समितीने व्यक्त केली आहे.
दरम्यान या महोत्सवातील पुस्तकांवर २५ टक्के सवलत दिल्यास या साहित्यास सोन्याचे दिवस येतील, अशी प्रतिक्रिया अनेक पुस्तक प्रेमी नागरिक यांनी व्यक्त केली. इंदापूर येथील मोबाईल व्यसनमुक्ती हे पुस्तक लिहिलेले इंदापूर येथील प्राचार्य तुषार रंजनकर तसेच त्यांचे सहकारी नवनाथ सर यांच्या पुस्तकाची लाखो लोकांनी दखल घेतल्याने इंदापूर येथे आनंदोत्सव साजरा झाल्याची माहिती अरविंद गारटकर आणि दिपक जगताप यांनी दिली.
