बरेली: आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार नवनवीन मार्गांनी सुशिक्षित नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. उत्तर प्रदेशातील बरेली येथे अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे एका ८ वीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाने दाखवलेल्या कमालीच्या हुशारीमुळे त्याचे आई-वडील एका मोठ्या आर्थिक संकटातून बचावले. तन्मय नावाच्या या मुलाने केवळ एका 'फ्लाईट मोड'च्या साहाय्याने सायबर चोरांचा संपूर्ण कट उधळून लावला.
या घटनेची सुरुवात एका बेकरी मालकाला आलेल्या निनावी फोन कॉलने झाली. समोरच्या व्यक्तीने स्वतःला 'एनआयए' (NIA) चा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. तुमच्या मोबाईल क्रमांकाचा संबंध दहशतवादी कारवायांशी असून, तुम्ही ३०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहात, अशी भीती त्यांना घालण्यात आली. गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपवर एक बनावट 'अरेस्ट वॉरंट' पाठवल्यामुळे हे दांपत्य प्रचंड दडपणाखाली आले आणि त्यांना 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आले.
सायबर भामट्यांनी या दांपत्यावर असा मानसिक दबाव टाकला की, त्यांना घराबाहेर न पडण्याचे आणि सतत व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्याचे आदेश दिले. चोरांच्या सांगण्यानुसार, अगदी झोपणे, खाणे किंवा बोलणे या सर्व क्रिया कॅमेऱ्यासमोरच कराव्या लागत होत्या. भीतीपोटी सक्सेना दांपत्याने आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती, घरातील दागिने आणि मालमत्तेचे तपशील गुन्हेगारांना देऊन टाकले होते. फसवणुकीचा हा डाव आता पूर्णत्वास जाणारच होता.
नेमक्या याच वेळी त्यांचा मुलगा तन्मय तिथे पोहोचला. त्याने यापूर्वी वृत्तपत्रांमधील बातम्यांद्वारे 'डिजिटल अरेस्ट'च्या पद्धतीबद्दल वाचले होते, त्यामुळे त्याला परिस्थितीचा अंदाज आला. आई-वडील प्रचंड घाबरलेले असल्यामुळे ते त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तन्मयने धाडस करून वडिलांचा फोन हिसकावून घेतला आणि तो तात्काळ 'एअरप्लेन मोड'वर टाकला. संपर्क तुटल्यामुळे गुन्हेगारांना पुढील व्यवहार करता आले नाहीत आणि बँक खाते सुरक्षित राहिले.
दुसऱ्या दिवशी या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. बरेलीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तन्मयच्या या धाडसाचे आणि जागरूकतेचे कौतुक केले आहे. सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आणि अशा अफवांना बळी न पडणे हेच सर्वात मोठे सुरक्षा कवच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
