इंदापूर: रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेन्ट्रल आणि 'झी मराठी' यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला 'पैठणीचा महासंग्राम' हा बहुचर्चित कार्यक्रम ९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या स्पर्धेला इंदापूरकर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. नगरपालिकेजवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ येथे सायंकाळी ठीक ६.०० वाजता या रंगतदार खेळाला सुरुवात झाली. 'इंदापुरात रंगणार पैठणीचा डाव' या घोषणेप्रमाणेच, कार्यक्रमात उत्साह, रंगत आणि थरार यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत शेकडो महिलांनी या खास स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या शानदार कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री तनिष्का विशे व प्रियांका मुंगेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या आगमनाने उपस्थित महिलांचा उत्साह दुणावला. यांच्यासोबतच इंदापूर शहरातील अनेक प्रतिष्ठित महिलांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यामध्ये शोभाताई भरणे, माजी नगराध्यक्षा अंकीताताई शहा, वैशाली शहा, नगरसेविका दीप्ती राऊत, मयुरी उंबरे आणि सुनिता नलवडे यांचा विशेष समावेश होता. या सर्व मान्यवर महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला `एक वेगळीच उंची मिळाली.
विविध मनोरंजक खेळ आणि उखाण्यांच्या या रंगतदार डावात महिलांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. या स्पर्धेत जिंकलेल्या अनेक महिलांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली. तर, सर्व फेऱ्या पार करून अंतिम फेरी जिंकणाऱ्या महाविजेत्या अश्विनी गोळे, मनीषा नरुटे व आकांक्षा शहा यांना अत्यंत आकर्षक अशी 'मानाची पैठणी' देऊन गौरविण्यात आले. यासोबत ५० महिलांना लकी ड्रॉ मार्फत बक्षिसे तर ३०० महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
डिस्ट्रीक्ट ३१३१ लिटरसी डायरेक्टर रो. वसंतराव मालुंजकर आणि अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे संयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या महिलांच्या कार्यक्रमाची धुरा समन्वयक म्हणून रो. मंदाकिनी डोंबाळे, रो. अमृता शिंदे व रो. हेमलता मालुंजकर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सांभाळली. या शानदार यशाबद्दल बोलताना रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे म्हणाले, "इंदापूरमधील महिलांसाठी हा खास कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब नेहमीच असे उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध राहील."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झी मराठीचे श्री.अभ्यंकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी रो. आझाद पटेल, रो. मोहन भोसले, रो. समीर सूर्यवंशी, रो. राजाराम सागर, रो.विष्णू पवार, रो. मोरेश्वर कोकरे, रो. सुधीर शेंडे, रो. चंद्रकांत तरंगे, रो. किरण सातपुते, रो. अमर बंडगर आणि रो. सुनील टेळे उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या यशस्वी आणि नेटक्या आयोजनाबद्दल इंदापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
