इंदापूर: इंदापूर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात आज, ३० एप्रिल २०२६ रोजी नरसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संभाजी चौक परिसरात असलेल्या या प्राचीन मंदिरात सायंकाळी ७.०० वाजता मुख्य जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या निमित्त संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
जयंतीनिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. श्री लक्ष्मी नरसिंहास महाअभिषेक आणि पवमान अभिषेक अर्पण करण्यात आला. सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत ह.भ.प. महादेव महाराज क्षीरसागर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. या कीर्तनास विठ्ठलवाडी, बिजवडी कारखाना, वरकुटे बुद्रुक, कालठण आणि इंदापूर येथील भजनी मंडळांनी मोलाची साथ दिली, ज्यामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.
मंदिराचे पुजारी अमोद कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी आणि अमित कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नरसिंहाची महाआरती करण्यात आली. या मंगल प्रसंगी इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली शहा, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णा ताटे सर आणि इंदापूर तालुक्याचे भाजप नेते माननीय श्री प्रदीपदादा गारटकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये अहमदरजा सय्यद, प्रसाद गारटकर, बापू राहिगुडे आणि ॲड. गिरीश शहा यांचा समावेश होता. नरसिंह जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाचे नियोजन गेल्या चार वर्षांप्रमाणेच यावर्षीही शिवशंकर (मामा) मिश्रा, गणेश भिसे आणि त्यांच्या मित्र मंडळाकडून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री लक्ष्मी नरसिंह मंडळाचे कार्यकर्ते महादेव चव्हाण सर, अनिल चव्हाण, सुनील यादव, राजेश शुक्ल आणि बबन सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण जयंती उत्सव आनंदी आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. दर्शनासाठी इंदापूर शहर व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

