इंदापूर: न्यायालयीन सुनावणीदरम्यान बेरोजगार युवकांचा 'कोकरोच' (झुरळ) असा उल्लेख केल्याच्या कथित वक्तव्याचे पडसाद आता सोशल मीडियावर तीव्रतेने उमटू लागले आहेत. या शब्दाचा निषेध म्हणून एका युवकाने सुरू केलेल्या 'कोकरोच जनता पार्टी' (Cockroach Janata Party) या संकल्पनेला आता राज्यातील आणि देशातील इतर बेरोजगार तरुणांनी थेट डिजिटल ट्रेंड बनवले आहे. या संधीचा फायदा घेत अनेक युवकांनी याच नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट्सचा सुळसुळाट सुरू केला असून, या ट्रेंडमुळे त्यांना अवघ्या काही तासांत हजारो फॉलोअर्स मिळत असल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला हा प्रकार केवळ वक्तव्याचा निषेध आणि सुशिक्षित बेरोजगारांची व्यथा मांडणारा एक उपरोधात्मक (Satirical) मार्ग म्हणून समोर आला होता. "आम्ही कोकरोच आहोत, पण देशाच्या विकासासाठी झटत आहोत," अशी स्वाभिमानी भूमिका पहिल्या अकाऊंटवरून मांडण्यात आली होती. मात्र, सोशल मीडियावर हा विषय प्रचंड वेगाने 'व्हायरल' झाल्याचे पाहून इतर अनेक डिजिटल क्रिएटर्स आणि युवकांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यास सुरुवात केली आहे.
इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सध्या 'कोकरोच जनता पार्टी', 'क्रिएटीव्ह कोकरोच', 'बेरोजगार कोकरोच' अशा नामांतराची लाट आली आहे. चालू असलेल्या ट्रेंडचा (Trending Topic) फायदा घेऊन आपले वैयक्तिक फॉलोअर्स वाढवणे, रिल्स व्हायरल करणे आणि अकाऊंटची रीच वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश बनला आहे. नेटकरीही या उपरोधात्मक नावांकडे आकर्षित होत असल्याने, अशा नवीन अकाऊंट्सना अवघ्या काही दिवसांत लाखो व्ह्यूज आणि मोठे फॉलोअर्स बेस मिळत आहेत.
या वाढत्या ट्रेंडमुळे मूळ गंभीर विषयाचे गांभीर्य काहीसे कमी होत चालल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. एकीकडे गंभीरपणे बेरोजगारीच्या समस्येवर आणि उच्चपदस्थांच्या भाषेवर आक्षेप घेणारा वर्ग आहे; तर दुसरीकडे केवळ 'फॉलोअर्स आणि लाईक्स' मिळवण्यासाठी या संवेदनशील मुद्द्याचा वापर करणारे युवक आहेत. यामुळे सोशल मीडियावरील हा निषेध केवळ एक तात्पुरता 'मीम ट्रेंड' बनून राहतो की यातून युवकांच्या प्रश्नांना खरोखरच वाचा फुटते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

